कोल्हापुरात ऊस दराची ठिणगी पडली; कणेरीवाडीजवळ ट्रॅक्टर रोखला

कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात उसाला पहिली उचल प्रतिटन ३७५१ रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कागलच्या शाहू कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कणेरीवाडीजवळ रोखून धरल्यामुळे परिसरात काही काळ तनाव निर्माण झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेच्या माध्यमातून यंदा उसाला प्रतिटन ३७५१ ये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी दसरा व दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उसाची मोळी टाकून हंगामाला सुरुवात केली आहे. काही कारखान्यांचे तोडणीचे नियोजनही जाहीर झाले आहे. ऊस दराच्या मागणीसाठी कागलच्या शाहू कारखान्यासाठी ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील व त्यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी कणेरीवाडीजवळ अडवला. ऊसाची पहिली उचल संघटनेच्या मागणीनुसार जाहीर होणार नाही, तोपर्यंत हंगाम सुरू करू देणार नाही आणि ऊस वाहतूक करणारी वाहनेही अडवू, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. तोडलेला ऊस अडवून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ट्रॅक्टर सोडून दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here