राजकारणातून नव्हे, बाजारभावातून ठरतो ऊसदर : आ. जयंतराव पाटील

सांगली : कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा योग्य वापर झाला तर शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल व उत्पादन वाढेल. उसाचा दर हा कार्यक्षमतेवर व बाजारभावावर ठरतो, राजकारणातून नाही, असे प्रतिपादन आ. जयंतराव पाटील यांनी केले. वाळवा तालुक्यात महापुरात उसाचे नुकसान झाले आहे. खुंटलेल्या उसाची तोडणी करण्याबाबत कारखान्याने धोरण आखावे, असे त्यांनी सांगितले.राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, देवराज पाटील, कार्तिक पाटील, अतुल पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. जयंत पाटील म्हणाले, ऊस उत्पादन शाश्वत ठेवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. आपला साखर कारखाना पारदर्शी आहे. वजनात फेरपार करणाऱ्यावर नुकतीच कारवाई झाली आहे. खासगी कारखान्यांना ऊस देण्याऐवजी सहकारी कारखान्यांना प्राधान्य द्यावे. कर्ज कमी करण्यासाठी व क्षमता वाढीसाठी कारखान्याचे नियोजन सुरू आहे. पी. आर. पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखान्याची संख्या राज्यात कमी होत चालली आहे. ही बाब चिंतनीय आहे. राज्यात आदर्श ठरलेल्या राजारामबापू साखर कारखान्याचा लौकिक कायम राखण्यासाठी ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्यास गाळप करावा.

प्रतीक पाटील म्हणाले, गत वर्षीचा उस गळीत हंगाम शंभर दिवसाचा ठरला आहे. यामुळे उसाची आणि साखर उत्पादनात घट झाली आहे. कारखान्याने सौर उर्जा प्रकल्प पूर्ण केला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याच्या भाग विकास निधीतून पाणंद रस्ते तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. येणाऱ्या दोन वर्षात आपला कारखाना कर्ज मुक्त होईल यासाठी ट्रिपल बी प्लस मानांकनासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कार्यक्षेत्रातील गावात संपर्क दौऱ्यातून सभासदांच्या अडचणी जाणून घेत आहे.

शहाजीबापू पाटील यांनी कृषी महोत्सव पुन्हा सुरू करावा यासह कारखान्याच्यावतीने कुस्त्यांचे मैदान सुरू करावे याकडे लक्ष वेधले. नोटीस वाचन सचिव डी.एम. पाटील यांनी केले. यावेळी प्रा. शामराव पाटील, रणजित पाटील, अमरसिंह साळुंखे, शैलेश पाटील, डॉ. योजना शिंदे, बी. के. पाटील, रविंद्र बर्डे, सर्जेराव देशमुख, शंकर पाटील, विनायकराव पाटील, दिलीप पाटील, विराज शिंदे आदीसह संचालक, सभासद उपस्थित होते. विजयराव पाटील यांनी आभार मानले.

मका, भातापासून इथेनॉल तयार करावे…

आ. जयंतराव पाटील म्हणाले, केंद्र सरकारने साखरेचे व इथेनॉलचे दर वाढवावेत, यासाठी काही प्रयत्न झाले, मात्र त्यास फारसे यश आलेले नाही. उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याऐवजी मका, भातापासून इथेनॉल तयार करावे, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here