ऊसदरप्रश्नी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे कार्यवाहीची वारणा कारखान्याकडे मागणी

कोल्हापूर : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने गत हंगामातील तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये प्रतिटन एवढी उर्वरित रक्कम द्यावी, तसेच चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन ३७५१ रुपये जाहीर करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे ११ नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला. संचालक शहाजी पाटील, सुरेश पाटील आणि कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी निवेदन स्वीकारले.

कारखान्याकडून कार्यक्षेत्राबाहेरील ५० ते १०० किलोमीटरवरून ऊस वाहतूक करून शेतकऱ्यांवर अतिरिक्त १०० ते ३०० रुपये प्रतिटन खर्च टाकला जात असल्याची तक्रार केली. त्यामुळे चालू हंगामात २५ किलोमीटरपर्यंतचीच तोडणी-वाहतूक कारखान्याने करावी, अन्यथा ११ नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ‘स्वाभिमानी’ने दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, संपर्कप्रमुख अण्णा मगदूम, सरचिटणीस संपत पवार, तालुकाध्यक्ष सुधीर मगदूम, विवेकानंद बच्चे, विजय सावंत, दिग्विजय पाटील, प्रवीण घोरपडे, जितेंद्र माने, कृष्णात मोहिते, भागवत कांबळे, सुरेश पाटील, अंकुराज पाटील, राजेंद्र मालगावे, सुनील सूर्यवंशी, आदिनाथ पाटील, भरतेश्वर भोकटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here