कोल्हापुरात ऊस दर आंदोलन भडकले : ‘स्वाभिमानी’कडून दालमिया, डी. वाय. कारखान्याच्या गटशेती कार्यालयांना टाळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन भडकले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी आक्रमक पवित्रा घेत चौथ्या दिवशी तीव्र आंदोलन केले. यावेळी कोपार्डे, वाकरे, कळे येथे दत्त दालमिया साखर कारखाना आणि डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या एकूण चार शेती गट कार्यालयांना टाळे ठोकले. डी. वाय. पाटील साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली. साखर कारखान्यांनी दराचा तोडगा निघेपर्यंत हंगाम सुरू करू नये, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यानंतरही कारखाने ऊस वाहतूक करीत असल्याने कळे येथे डी.वाय.पाटील व दालमिया, कोपार्डे येथे डी. वाय. पाटील आणि वाकरे येथे दालमिया साखर कारखान्याची शेती गट कार्यालये गाठली. या ठिकाणी असणाऱ्या या दोन कारखान्यांच्या चार शेती गट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाळे ठोकले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी स्वाभिमानी व कारखानदारांची ऊसदराबाबत झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दिवसभर ऊसाची वहाने रस्त्यावर दिसली नाहीत. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत प्रतिटन ३७५१ रुपयांची मागणी केली आहे. जोपर्यंत कारखानदार हा दर जाहीर करणार नाहीत. तोपर्यंत कारखाने सुरू करू नये, असे आवाहन केले आहे. तर गत हंगामातील २०० रुपयांसाठी उद्यापासून आंदोलन करण्याची घोषणा जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, भगवान काटे यांनी केली आहे. आरएसएफ नुसार मागील हंगाम २०२४-२५ मधील गाळप झालेल्या सालचा हिशोब अद्यापही साखर आयुक्तांना सादर केलेला नाही, तरीही साखर कारखाने सुरू झाले आहेत. याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पाटणे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या, पोलिसांचा लाठीमार

चंदगड येथील पाटणे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी आंदोलन केले. साखर कारखान्यांकडून थकीत बिले मिळाल्याशिवाय उसाच्या कांडक्यालाही हात लावू देणार नाही, असा इशारा संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शेतकऱ्यांनीही तोडणीसाठी गडबड करू नये, असे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनावेळी पोलिसांनी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांना धक्काबुक्की केली. गड्ड्यान्नावर यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन चंदगडला नेले. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. जोपर्यंत गड्डान्नावर यांना आंदोलनस्थळी आणले जात नाही, तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी गड्ड्यान्नावर यांना आंदोलनस्थळी आणले.

राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले की, या विभागातील इको केन शुगर्स, ओलम शुगर्स, दौलत अथर्व, आजरा व आप्पासाहेब नलवडे कारखान्यांकडे २५ कोटी ८४ लाख रुपये थकबाकी आहे. व्याजासह ही रक्कम २७ कोटी रुपये होते. ही रक्कम मिळाली पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिय्या आंदोलन केले. पोलिस निरीक्षक पाटील यांनी आंदोलन थांबविण्याची विनंती केली असता वादाचा प्रसंग घडला. पोलिस बळाचा वापर करून गड्ड्यान्नावर यांना तिथून चंदगड पोलिस ठाण्यात आणले. आंदोलकांनी कारखान्याच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी चंदगडला यावे, असा निरोप त्यांनी दिला. त्यावर आंदोलकांनी त्याला विरोध केला. नंतर पोलिसांनी गड्ड्यान्नावर यांना परत आणले. त्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

‘आरएसएफ’नुसार २०० रुपये दरासाठी जय शिवराय किसान संघटनेची आंदोलनाची घोषणा

मागील हंगामातील रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलानुसार हिशेब दिल्याशिवाय आणि चालू हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करता येत नाहीत. मात्र कायद्याचे उल्लंघन करून जिल्ह्यातील बरेच कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांच्या चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालकांवर नियमभंगाची कारवाई करावी आणि चालू हंगामातील एफआरपी अधिक २०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, भगवान काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत माने यांनी सांगितले की, कोल्हापूर विभागातील सर्वच साखर कारखान्यांनी आरएसएफनुसार मागील हंगाम २०२४- २५ मधील गाळप झालेल्या उसाचा हिशेब अद्यापही साखर आयुक्तांना सादर केलेला नाही, तरीही साखर कारखाने सुरू झाले आहेत याला आमचा विरोध आहे. साखर सहसंचालकांकडूनही याबाबत कार्यवाही झालेली नाही. मागील थकीत रक्कम मिळत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही. यासाठी गुरुवारपासून बेमुदत आंदोलन करणार आहे. यावेळी जनार्दन पाटील, वैभव कांबळे, रूपेश पाटील, ज्ञानदेव पाटील, रंगराव पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here