कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर या प्रामुख्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यांतील साखर कारखानदारांनी, शेजारच्या कर्नाटकातील कारखान्यांना ऊस जाऊ नये, म्हणून यावर्षी गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. गेल्या काही वर्षांपासून, कर्नाटकातील साखर कारखाने, गाळप हंगाम लवकर सुरू करतात. हे कारखानदार महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात ऊस खरेदी करत आहेत. कर्नाटकातील साखर कारखाने गाळप क्षमता जास्त असतानाही कमी ऊस उत्पादनामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमधून ऊस खरेदीस प्राधान्य देतात. परिणामी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर येथील साखर कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्यांना लवकर गाळप बंद करावे लागत आहे.
याबाबत, हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे म्हणाले की, अलिकडच्या काळात कर्नाटकचा गाळप हंगाम महाराष्ट्रापूर्वी सुरू होत आहे. त्यांचे कारखाने महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रथम ऊस तोडणी करतात. आमचे कारखाने उशिरा काम सुरू करत असल्याने, आमच्याकडे पुरेसा ऊस शिल्लक नसतो. हे कारखाने पूर्ण हंगाम चालवू शकत नाहीत. यावर्षी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून सीमावर्ती जिल्ह्यांतील कारखान्यांना लवकर गाळप सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे कर्नाटकात ऊस जाण्यापासून रोखण्यास मदत होईल, असे औताडे म्हणाले.
साखर आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “आता कोणतेही भौगोलिक निर्बंध नाहीत. शेतकऱ्यांना लवकर ऊस तोडणी करायची असते, कारण त्यांची शेते लवकर मोकळी होतात, आणि त्यांना लवकर पैसे मिळतात. गेल्यावर्षी कर्नाटकने महाराष्ट्राला पत्र लिहून दोन्ही राज्यांनी १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करावा, अशी सूचना केली होती. परंतु त्यांनी एक आठवडा आधीच कारखाने सुरू केले. त्यामुळे आमचे नुकसान झाले. दरवर्षी किमान १० लाख टन ऊस कर्नाटकला जात आहे असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.
सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम केलेले साखर आयुक्तालयाचे अधिकारी सचिन बर्हाटे यांनी या ट्रेंडला दुजोरा दिला. ते म्हणाले की, दरवर्षी सरासरी सुमारे १० लाख टन ऊस कर्नाटकात जातो. यावर्षी महाराष्ट्रातील कारखान्यांनी लवकर गाळप सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार या मुद्द्यावर निर्णय घेईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगांच्या मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार गाळप हंगाम वाढवण्याचा विचार करत आहे. पारंपरिकपणे, कर्नाटकातील कारखाने दसऱ्यानंतर लगेचच काम सुरू करतात. तर महाराष्ट्रातील कारखाने दिवाळीनंतर, म्हणजेच एक ते दोन आठवड्यांच्या अंतराने काम सुरू करतात.