पुणे : दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमिनीची सुपिकता आणि कमी होत चाललेली उत्पादकता व साखर उतारा यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. उसाची उत्पादकता घटत असल्याने पिकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. याला हवामानातील विविध घटक जाणून क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर ज्ञानाचा व पर्यायाने शेती व्यवस्थापनाचा अभाव कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सद्यस्थितीत शेतीत खते व किडनाशकांचा अनावश्यक अधिक वापर होत आहे. त्यातही ऊस शेतीत हा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याला पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जलस्रोतांवर वाढणारा ताण कारणीभूत आहे. मशागत, खते, किटकनाशके अशा गोष्टींमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला एकरी उत्पादन खर्च पाहता शेतकरी हतबल होत आहे. याशिवाय, ऊस पिकावर कीड व रोगांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव ही चिंतेची बाब ठरत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये को-238 ची लागवड न करण्याचे आवाहन
उत्तर प्रदेशमध्ये को-238 जातीच्या उसावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. काही साखर कारखानदारांनी को-238 पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रेड रॉट किडीने बाधित झालेल्या उसाची पाने पिवळी पडून सुकायला लागतात आणि हळूहळू संपूर्ण ऊस सुकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते. साखर कारखान्यांना उसाचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये को-238 उसाच्या जातीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्याएवजी रोगप्रतिकार शक्ती चांगली असलेला आणि कमी पाणी लागणाऱ्या ऊस जातीची लागवड करावी, असा सल्ला दिला जाऊ लागला आहे.


















