बीड : जिल्हा प्रशासन, कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये मंगळवारी (ता. २६) सायंकाळी झालेल्या संयुक्त बैठकीत ऊस दराबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन कायम ठेवण्याची घोषणा युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात केली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या दालनात झालेल्या बैठकीवेळी दराबाबत तोडगा निघाला नाही. आंदोलनामुळे ऊस वाहतूक ठप्प झाली आहे.
सोमवारी शेतकरी, युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी माजलगाव महामार्ग रोखून धरला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. बैठकीला अजय बुरांडे, कालिदास आपेट, कुलदीप करपे, दत्ता डाके, नारायण गोले, अजय राऊत, जगदीश फरताडे, तुकाराम नावडकर, दिनकर चाळक, विजय दराडे, कृष्णा सोळंके, मोहन जाधव, नामदेव सोजे, शेतकरी, जिल्हा उपनिबंधक, अप्पर पोलिस अधीक्षक, कारखान्यांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, यावेळी ऊस दराविषयी तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत. माजलगाव तालुक्यात ऊसतोड, वाहतूक ठप्प झाल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे.


















