कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात उसावर तांबेरा, मावा किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा सामान करावा लागला. सततचा पाऊस, नद्यांना आलेला पूर व बदलत्या हवामानामुळे उसावर मोठ्या प्रमाणात तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे.तांबेऱ्यासह मावा किडीचा उसावर फैलाव होऊ लागला आहे. परिणामी, नदीकाठासह सर्वच ठिकाणची ऊस पिके अडचणीत आहेत. अतिपाण्यामुळे जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी ऊस उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटीचा फटका ऊस उत्पादकासह साखर कारखान्यांनाही बसणार आहे.
अतिपाऊस व वातावरणातील बदलांमुळे उसावर तांबेऱ्यासह मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने आंतर मशागतीची कामे झाली नाहीत. त्यामुळे पिकांना खताची मात्रा व औषध फवारणी करता आली नाही. याचा परिणामही ऊस वाढीवर झाला आहे. उसावर तांबेरा व मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतात आंतरमशागत न झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणात तण व पाण्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. परिणामी औषध फवारणीस अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी ड्रोनद्वारे फवारणी करीत आहेत.