धाराशिव : सद्यस्थितीत ऊस पिकाचे कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन करून उसाची चांगली वाढ होण्यासाठी व जाडी वाढवण्याच्या अनुषंगाने नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणीचे चेअरमन व कार्यकारी संचालक कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून कारखान्याने सभासद आणि बिगर सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस पिकाची ड्रोनद्वारे फवारणी करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नॅचरल शुगर मार्फत नोंदणीकृत शेतकऱ्यांचा ऊस फवारण्याकरिता भाडेतत्त्वावरील ड्रोन फवारणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत चेअरमन बी. बी. ठोंबरे, संचालक पांडुरंग आवाड, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणगाव, टाकळगाव, तांदूळजा परिसरातील शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे ऊस फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. नॅचरल शुगरचे ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी ड्रोन फवारणी करीत असताना त्याचा उडण्याचा वेग साधारणतः ४.५ ते ५.० मीटर प्रति सेकंद एवढा असतो त्यामुळे कमी वेळेत जास्त फवारणी क्षेत्र होते. प्रती एकर निविष्ठा मात्रा प्रचलित पद्धतीने फवारणी करीत असताना जेवढी असते तेवढीच वापरावी. मात्र पाण्याचे प्रमाण पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत प्रती एकर ८ लिटर, व पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत अथवा दाट वाढणाऱ्या पिकामध्ये प्रती एकर १० ते १२ लिटर एवढे लागते.
फवारणी करीत असताना तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस पेक्षा कमी, आर्द्रता ४५ ते ५५ टक्क्यांपेक्षा जास्त व वाऱ्याचा वेग ३ ते ३.५ मीटर प्रतिसेकंद पेक्षा कमी असावा. पाऊस असताना फवारणी करू नये या तांत्रिक बाबींची माहिती देऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वसंत ऊर्जा, सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीचे फायदे समजावून सांगून फवारणीसाठी तयार करावयाचे द्रावण याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण येळकर यांनी करून दाखवले. यावेळी नॅचरल शुगरचे कृषी पर्यवेक्षक लहू काळदाते, हनुमंत पालकर, भास्कर वाघमोडे, कृषी सहाय्यक मेघनाथ माळी, आरेफ शेख, वैभव भिसे, स्वप्निल खोसे, शिवदास फुटाणे, शिवानंद बिडवे, इस्माईल शेख, गोविंद गायकवाड व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगणगावचे शेतकरी तुकाराम कस्पटे म्हणाले कि, ऊस पीक ८ ते १५ फूट उंचीचे झाले आहे. पाठीवर फवारणी पंप घेऊन शेतात फवारणी करणे शक्य नाही. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे विंचू, काटा, सापांची भीती दूर झाली आहे. वेळ, पैसा व शारीरिक कष्ट वाचले आहेत. टाकळगावचे शेतकरी विश्वंभर घवले म्हणाले कि, पारंपरिक पद्धतीने पाठीवर पंप घेऊन प्रतिबंधात्मक औषध फवारणीसाठी एक एकर क्षेत्रासाठी पाच ते सहा टाक्या लागतात. तब्बल सव्वा तास वेळ लागतो. हेच काम ड्रोनद्वारे सात ते आठ मिनिटांमध्ये पूर्ण होते. ड्रोनद्वारे फवारणीसाठी एकरी ७०० ते ८०० रुपये फवारणीचा खर्च येतो मात्र नॅचरल शुगरने अनुदानित स्वरूपात ड्रोन फवारणीसाठी उपलब्ध केल्यामुळे अवघ्या २५० रुपयांमध्ये एक एकर क्षेत्राची फवारणी झाली त्यामुळे खर्चामध्ये बचत झाली.