महाराष्ट्रात अतिवृष्टिबाधित ऊस पिकात उपाययोजना करा – कृषीतज्ज्ञांचे आवाहन

पुणे : महाराष्ट्रामध्ये यंदा निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये उसाखालील क्षेत्र पाण्याखाली गेले. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यःस्थितीत पूरग्रस्त परिस्थितीमुळे ऊस पिकाचे होणारे संभाव्य नुकसान जाणून त्यानुसार उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. पूर रेषेतील क्षेत्रात ऊस लागण करताना को ८६०३२ आणि कोएम ०२६५ या वाणाची निवड करावी. अति पाण्याची किंवा पूर परिस्थिती प्रत्येक वर्षी उद्भवणाऱ्या ठिकाणी जास्त बेण्याचा वापर करावा, असे आवाहन मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभागातील डॉ. गणेश कोटगिरे आणि रमेश गायकवाड यांनी केले आहे.

याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, हेक्टरी साधारणपणे १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त गाळपाचा ऊस लोळण्यास प्रतिबंध होतो. ऊस अति पाण्यात जास्त दिवस राहिल्यास लवकर पक्व होतो. त्यामुळे तोडणी कार्यक्रमास अशा उसाची तोडणी अग्रक्रमाने करायला हवी. पावसाचे पाणी जास्त प्रमाणात व जास्त दिवस साचून शेतात राहिल्यास नत्राचा -हास होतो. परिणामी उसाच्या राखीव वाढीस मर्यादा येतात. असा ऊस लवकर गाळपास न्यावा. पूरग्रस्त परिस्थितीमुळे जमिनीतील प्राणवायूची पातळी कमी झाल्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊन उसाची पाने पिवळी पडतात. वाढ खुंटते. मुळांची कार्यक्षमता घटल्याने पाणी व अन्नद्रव्ये शोषण योग्यप्रकारे होत नाही. तसेच बाष्पीभवन व कर्वग्रहण क्रिया मंदावल्याचे दिसून येते. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ ऊस पाण्यात बुडाल्यास पाने वाळतात व ऊस कुजू लागतो.

डॉ. कोटगिरे आणि गायकवाड यांनी सांगितले की, उसाच्या नवीन लागवडीत ७ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी राहिल्यास बहुसंख्य डोळे कुजतात. परिणामी उगवण कमी होते. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर आणि माती पूर्णपणे सुकल्यावर मातीचे नमुने घ्यावेत. माती परिक्षण करून पोषक अन्नद्रव्यांची आणि सेंद्रिय कर्ब प्रमाण तपासणी करावी. अंशतः बुडालेल्या पिकावर पुरामुळे वाहून आलेल्या नदी पात्रातील गाळाचा चांगला परिणाम दिसून येतो. पुराच्या पाण्यात पूर्णतः बुडालेले पीक नदीतील वाहून आलेल्या गाळामुळे खराब झालेले असल्याने ते काढून टाकावे. ज्या ठिकाणी ऊस ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली बुडून कुजला असेल अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर शेतातील ऊस काढून घ्यावा. त्याचा कंपोस्ट करण्यासाठी वापर करता येतो. ज्या ठिकाणी ऊस अंशतः वाढलेला आहे. परंतु, गाळमिश्रित पाणी पोंग्यामध्ये गेल्यामुळे पोंगा कुजून वाढ खुंटली आहे, अशा पिकाचा खोडवा घ्यावा. अंशतः पाण्याखाली बुडालेल्या पूरग्रस्त शेतातील उसाची वाढ पुन्हा चांगल्याप्रकारे होण्यासाठी हेक्टरी ६० किलो नत्र (११० किलो युरिया), ४० किलो पालाश (६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) व १२.५ किलो मायक्रोसोलचा वापर करावा. उसाच्या पानांवरील तांबेरा, पोक्का बोंग व तपकिरी ठिपके या रोगाच्या नियंत्रणाकरिता मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. ऊस तोडणीनंतर बुडख्यांवर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here