नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असून त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. भारतीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी घसरले. सेन्सेक्स ८८०.३४ अंकांनी (१.१० टक्के) घसरून ७९,४५४.४७ अंकांवर बंद झाला आणि निफ्टी २६५.८० अंकांनी (१.१० टक्के) घसरून २४,००८.०० अंकांवर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी रिअॅल्टीला सर्वाधिक फटका बसला आणि त्यात तब्बल २.४ टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज संपलेल्या आठवड्यात एकूण सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे २ टक्क्यांनी घसरले.गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते.
पाकिस्तान सातत्याने युद्धबंदीचे उल्लंघन करत असून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील गावे आणि भारतीय सशस्त्र दलांच्या चौक्यांना लक्ष्य करत आहेत. भारताने पाकिस्तानचे भ्याड हल्ले प्रभावीपणे परतवून लावत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. धोरणात्मक फायदा आणि पाकिस्तानची कमकुवत आर्थिक स्थिती पाहता हा अल्पकालीन संघर्ष असण्याचा अंदाज आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. विशेष म्हणजे, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) कालपर्यंत भारतीय बाजारात गुंतवणूक करत राहिले, तर किरकोळ गुंतवणूकदार सध्या थोडे सावध आहेत, नायर पुढे म्हणाले.तीन महिन्यांनंतर भारतीय बाजारपेठेत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी निव्वळ खरेदीदार म्हणून काम केले, परंतु खरेदीचा वेग मंदावला आहे.