सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांमध्ये फळबाग लागवडीची संख्या वाढत आहे. यावर्षी तब्बल ४१ हजार ३२८ एकर क्षेत्रावर विविध प्रकारच्या फळबागांची लागवड करण्यात आली आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, यामध्ये सर्वाधिक द्राक्ष, डाळिंब, केळी आदी फळबागांसह विविध १८ प्रकारच्या फळबागांचा समावेश आहे. फळबाग लागवडीसाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे. शिवाय झटपट पैसे मिळत असल्याने उसापेक्षा फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
पंढरपूर तालुक्यातून वाहणारी भीमा नदी, उजनीचा उजवा, डावा कालवा, वीर-भाटघरचे पाणीही तालुक्यातील काही भागाला मिळत असल्यामुळे पाणीदार तालुका म्हणून पंढरपूरची ओळख आहे. पंढरपूरच्या आजूबाजूला असणारे सहकारी साखर कारखान्यांचे जाळे व मुबलक पाणी यामुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र असलेला पंढरपूर तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये उसाचे उत्पादन घटत आहे.
उसाचे पैसे मिळण्यास कारखानदारांकडून होणारी चालढकल, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे. शिवाय उसाचे पीक जाण्यासाठी १८ महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर पैसे मिळण्यासाठी सहा महिने जात असल्याने हातात पैसा खेळायला दोन वर्षे लागतात. फळबागांचे गणित याउलट आहे. फळबाग व्यापारी बांधावर येऊन खरेदी करत असल्याने मार्केटला जाणे, वाहतूक खर्च वाचत असल्यामुळे शेतकऱ्यांवर असलेला ताण कमी होत आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये बेदाणा, द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू आदी फळांना चांगला दर मिळत आहे.
सीताफळ, द्राक्ष, डाळिंब, पेरू आदी फळबागांना गेल्या काही वर्षांमध्ये ठराविक हंगामात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही शेतकरी हंगाम, वातावरण, दर आदी विविध प्रकारचा अभ्यास करून फळबागांची लागवड करीत आहेत. वातावरण, हंगामा, बाजारपेठ व दाराचा अंदाज घेऊन लागवड होत आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा माल पिकविणे शक्य आहे आहे. त्यामुळे उसापेक्षा फळबाग लागवडी तून चांगले उत्पन्न मिळत आहे, असे पटवर्धन कुरोलीचे शेतकरी अॅड. पांडुरंग नाईकनरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.