ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने शुक्रवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत २०९ जागा जिंकून जबरदस्त विजय मिळवला आणि ३०० सदस्यांच्या राष्ट्रीय संसदेत किंवा राष्ट्रसभेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवले.माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचे ६० वर्षीय पुत्र तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीने निवडणूक लढविली.निवडणुकीत मोठ्या मतांनी विजय मिळवूनही, बीएनपीकडून कोणतीही मिरवणूक किंवा रॅली आयोजित केली जाणार नाही, असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे आणि देशभरातील मशिदी, मंदिरे, चर्च येथे प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
बीएनपीचे मुख्य प्रतिस्पर्धी, इस्लामी जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी पराभव स्वीकारला आहे. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील युतीला फक्त ६८ जागा मिळाल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमधील संसदीय निवडणुकीत बीएनपीला निर्णायक विजय मिळाल्याबद्दल बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे अध्यक्ष तारिक रहमान यांचे अभिनंदन केले. X पोस्टमध्ये मोदी म्हणाले, “बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन करतो.”














