नवी दिल्ली : भारतात वार्षिक आधारावर निर्यातीत वाढ झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार मे महिन्यात निर्यात १५.४६ टक्के वाढून ३७.२९ अब्ज डॉलरवर पोहोचली. मात्र, गेल्या महिन्याच्या तुलनेत निर्यात वाढीत ७.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. यादरम्यान, व्यापार तूट वाढून २३.३३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. देशाची व्यापार तूट सध्या उच्चांकी स्तरावर आहे. आकडेवारीनुसार मे महिन्यात व्यापार तूट २३.३३ अब्ज डॉलर झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात व्यापार तूट ६.५२ अब्ज डॉलर होती. कारण, कोरोना महामारीमुळे भारताने इतर देशांकडून आयात कमी केली होती.
द क्विंटमधील वृत्तानुसार या आकडेवारीबाबत भारतीय निर्यातदारांच्या संघटनांचा महासंघ (फियो)चे महासंचालक अजय सहाय सोने आयातीत वाढ झाल्यामुळे व्यापार तुट वाढली आहे असे सांगितल्याचे एनडीटीव्हीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जेव्हा कोणताही देस निर्यातीच्या तुलनेत अधिक आयात करतो, तेव्हा त्याला व्यापार तुटीचा सामना करावा लागतो. मे महिन्यात आयात ५६.१४ टक्के वाढून ६०.६२ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ही आयात ३८.८३ अब्ज डॉलर होती. मे महिन्यात पेट्रोलियम पदार्थ आणि कच्च्या तेलाची आयात ९१.६ टक्के वाढून १८.१४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कोळसा, कोक, ब्रिकेट्सची आयात वाढली आहे. सोन्याची आयात ५.८२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मे २०२१ मध्ये ही ६७.७ कोटी डॉलर होती. दरम्यान डब्ल्यूटीओने जागतिक व्यापार वृद्धीचे अनुमान ३ टक्के केले आहे.











