पुणे : देशातील ऊस गाळप हंगाम झपाट्याने अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. हंगामात आतापर्यंत २६०८.९६ लाख टन ऊस गाळप करण्यात आला असून, एकूण २४६.३० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.४४ टक्के नोंदविण्यात आला आहे. गेल्या गळीत हंगामाच्या तुलनेत (२०२४-२५) ऊस गाळपात ९.२६ टक्के, तर साखर उत्पादनात ११.९३ टक्के वाढ झाली आहे. साखर उताऱ्यातही ०.२२ टक्क्याची सुधारणा दिसून येत आहे. मार्चअखेरपर्यंत अनेक राज्यांत गाळप हंगाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंद होणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढेल. एकीकडे उत्पादनात वाढ दिसत असली तरी हंगाम संपल्यानंतर बाजारातील पुरवठा टप्प्याटप्प्याने घटण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या उत्पादन वाढीमुळे तात्काळ दरवाढीचा दबाव दिसत नसला तरी एप्रिलनंतर पुरवठा घटल्यास खुल्या बाजारातील दरांमध्ये चढ-उतार होऊ शकतो.
सद्यस्थितीत एकूण ५३६ साखर कारखान्यांपैकी २४८ कारखाने बंद झाले आहेत. सध्या २८८ कारखान्यांत ऊस गाळप सुरू आहे. यंदा हंगाम समाप्तीचा वेग अधिक असल्याचे दिसते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील २१० कारखान्यांपैकी सध्या ११३ कारखाने सुरू असून, ९७ कारखाने बंद झाले आहेत. राज्यात आतापर्यंत १००७.४१ लाख टन ऊस गाळप करून ९५.२० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा देशाच्या सरासरीपेक्षा जास्त, ९.४५ टक्के आहे. कर्नाटकमध्ये ५१५.२० लाख टन ऊस गाळपातून ४४.०५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.५५ टक्के नोंदविण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात १२० कारखान्यांपैकी १०२ कारखाने सुरू असून आहेत. यंदा केंद्राचे निर्यात धोरण, साठा स्थिती आणि इथेनॉलसाठी वळवण्यात येणारी साखर यावरही आगामी दरांचे गणित अवलंबून राहणार आहे.

















