सोलापूर : शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ करणे, त्यांच्या शाश्वत विकासात भरीव योगदान देण्याचे प्रमुख ध्येय लोकशक्ती शुगरचे आहे. त्यादृष्टीने आमची वाटचाल राहील, अशी ग्वाही अथर्व ग्रुप कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली. एकरी उत्पादन वाढीसाठी विकासात्मक उपक्रम राबवून हा कारखाना कोल्हापूरच्या दौलत कारखान्याप्रमाणेच उत्तम चालविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकशक्ती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सोमवारी (ता. ८) सुरू झाला. यावेळी ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे व उद्योगपती शिवानंद पाटील यांच्या हस्ते मोळी पूजन करून गळितास प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते काट्याचे व पहिल्या ऊस वाहनाचे पूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन खोराटे होते. यावेळी भागीदार सुनील गुट्टे, संचालक पृथ्वीराज खोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी चेअरमन खोराटे यांनी जून महिन्यापासून आजपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक व जिद्दी मेहनतीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच कारखान्याच्या कामकाजावर स्वतः सह संचालक पृथ्वीराज खोराटे व भागीदार सुनील गुट्टे यांचे बारकाईने लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, १२ वर्षे कारखाना बंद राहिला आणि तो आज पुन्हा सुरू होत आहे. त्यासंदर्भातील माहिती मनोहर डोंगरे, विजय डोंगरे यांनी दिली.
यावेळी मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी माने, संजय कदम, बसवराज निंगफोडे, जगदीश करजगी, गजानंद उमराणी, बाळासाहेब गायकवाड, सिद्धेश्वर शिंदे, नागेश पवार, सचिन मळगे, विवेक पवार यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन मळगे यांनी केले, तर कार्यालयीन अधीक्षक विवेक पवार यांनी आभार मानले.

















