पुणे : देशातील साखर हंगामाचे सूप वाजण्याच्या मार्गावर आले असतानाच नव्या हंगामाला प्रारंभ होण्यापूर्वी साखरेचा किमान हमीभाव (MSP) वाढू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखाने, विविध संघांना साखर व इथेनॉलचा उत्पादन खर्च कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. साखरेच्या किमान हमीभावामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
देशात ज्या प्रमाणात एफआरपी वाढली, त्यातुलनेत MSP न वाढल्याने साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. त्यामुळे देशातील साखर उद्योगाकडून केंद्र सरकारकडे सातत्याने MSP मध्ये वाढ करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या पातळीवरही साखरेच्या किमान हमीभावात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. साखर कारखान्यांकडून एकत्र माहिती जमा झाल्यानंतर साखरेच्या हमीभाव वाढीविषयी विचार होईल, असे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत साखरेचा हमीभाव वाढवून मिळावा, यासाठी साखर संघटना प्रयत्न करत आहेत. देशातील नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेचा किमान हमीभाव वाढविण्याचा निर्णय झाला नाही, तर कारखानदारीची धुराडे पेटणे अशक्य आहे. मात्र, केंद्र सरकार खरेच हमीभाव वाढवणार आहे का, याविषयी साशंकता आहे.












