पणजी: राज्यातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद झाल्यापासून गेल्या पाच वर्षांत ऊस उत्पादकांमध्ये ४४ टक्क्यांनी, तर ऊस लागवड क्षेत्रात ४६ टक्क्यांनी घट झालेली आहे. आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आलेली आहे.
दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, संजीवनी कारखाना बंद झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस लागवड क्षेत्रात किती घट झाली? कारखाना बंद झाल्यापासून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याशी संबंधित कामगारांना किती आर्थिक मदत देण्यात आली? ऊस उत्पादन बंद केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत इतर पिकांची लागवड केली का? असे प्रश्न आमदार व्हिएगश यांनी विचारले होते.
या प्रश्नांच्या उत्तरात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२०–२१ मध्ये राज्यातील ६७६ शेतकरी ५४६ हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड करीत होते. परंतु, २०२५–२६ शेतकऱ्यांची संख्या ४४ टक्क्यांनी घटून २९८ झाली, तर क्षेत्र २५४.०७ हेक्टरवर आल्याचे दिसून येते. नारळ, सुपारीकडे वळले शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी कारखाना बंद झाल्याने ऊसाची लागवड करणे बंद केले, त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपापल्या शेतीमध्ये नारळ, सुपारीसह भाजीपाल्याची लागवड करण्यास सुरुवात केलेली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उत्तरात म्हटले आहे.
















