महाराष्ट्रातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, 78 साखर कारखान्यांचा पट्टा पडला!

कोल्हापूर : 25 फेब्रुवारी 2026 अखेर राज्यात 986.66 लाख मेट्रिक टन गाळप आणि 928.96 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.42 टक्के आहे. मागील हंगामात याच कालावधीत 802.43 लाख टन गाळप आणि 749.83 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. सरासरी साखर उतारा 9.34 टक्के इतका होता. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 78 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत 85 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला होता.

कोल्हापूर विभागाने आतापर्यंत 206.73 लाख टन उसाचे गाळप करून 226.72 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 10.97 टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागातील 39 पैकी 26 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून अन्य कारखान्यांचाही गाळप हंगाम पुढील काही दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागाने आतापर्यंत 209.69 लाख टन उसाचे गाळप करून 204.55 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा 9.75 टक्के आहे. पुणे विभागातील 32 पैकी 12 कारखाने आतापर्यंत बंद झाले आहेत. सोलापूर विभागात आतापर्यंत 211.86 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 180.9 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर विभागाचा उतारा 8.54 टक्के इतका आहे. विभागातील 49 पैकी 21 कारखाने बंद झाले आहेत.

अहिल्यानगर विभाग ऊस गाळपात चौथ्या क्रमांकावर असून या विभागात कारखान्यांनी आतापर्यंत 123.59 लाख टन गाळप करून 111.42 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहिल्यानगर विभागाचा साखर उतारा 9.02 टक्के आहे. विभागातील 28 साखर कारखान्यांपैकी 15 कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात कारखान्यांनी आतापर्यंत 104.53 लाख टन उसाचे गाळप करून 84.87लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर उतारा 8.12 टक्के इतका आहे.विभागातील 25 पैकी 2 कारखाने बंद झाले आहेत. नांदेड विभागात 116.9 लाख टन उसाचे गाळप करून 109.03 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 9.33 टक्के इतका आहे. विभागातील 30 पैकी केवळ 1 कारखाना बंद झाल्यचे साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

अमरावती विभागात 11.52 लाख टन उसाचे गाळप करून 10.67 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 9.26 टक्के आहे. नागपूर विभागात 1.84 लाख टन गाळप झाले असून 0.8 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 4.35 टक्के इतका आहे. विभागातील 3 पैकी 1 कारखाना बंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here