सोलापूर : शेतकऱ्यांच्या घामाला दाम आम्ही देऊ, उसाचे बिल, कामगारांचे पेमेंट, पार्टीचे पेमेंट वेळेत करण्याचे आमच्या हातात आहे. मात्र, या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी चांगला ऊस देणे शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीचा दर दिला तरच कारखानदारी टिकून राहणार असल्याचे ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले.
चालू गळीत हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३,१५० उच्चांकी दर देऊन ऊसदराची कोंडी फोडण्याचे काम ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी केले. यामुळे त्यांचा व चेअरमन कल्याणराव काळे यांचा जाहीर सत्कार कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व कामगारांच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
बोत्रे-पाटील म्हणाले की, आम्ही उसाला जास्तीत जास्त दर देऊन, हा कारखाना राज्यात एक नंबरवर येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. मात्र, शेतकऱ्यांनी चांगला ऊस गळीतास देणे गरजेचे आहे. उसाची प्रत चांगली असेल तर साखरेची रिकव्हरी चांगली मिळेल. बॅगिंग जास्त होईल परिणामी साखरेस चांगला दर मिळेल. अथक परिश्रमातून शेतकऱ्यांच्या कष्टातून स्व. वसंतदादांनी उभारलेला हा कारखाना टिकविण्याचे काम ओंकार ग्रुप करीत आहे.
चालू गळीत हंगामामध्ये काही अडचणीमुळे कारखाना चालू होण्यास विलंब झाला तरी हाच कारखाना पुढील गळीत हंगामामध्ये पाच ते साडेपाच हजार मे. टन दैनंदिन क्रशिंग करुन जास्तीत जास्त गाळप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त चांगला ऊस कारखान्यास गळितास द्यावा, कामगारांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपली कामे करावीत, आम्ही आपले कष्टाचे फळ देण्यास बांधील आहोत, असे बोत्रे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर आर. आर. साळुंखे यांनी चालू गळीत हंगामामध्ये ६१७३४ मे.टन गळीत झालेले असून, १०.५३ टक्के साखर उताऱ्याने ५३४०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याचे सांगितले. तसेच २३३४००० युनिट को-जन एक्सपोर्ट करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी सभासद नारायण शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक पी. डी. घोगरे यांनी केले. आभार संचालक मोहन नागटिळक यांनी मानले. यावेळी अरुण भाऊ बागल, वसंत फाटे, मधुकर ताटे, सुधीर शिनगारे, शहाजी साळुंखे यांच्यासह सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















