सोलापूर जिल्ह्यात ऊस दरवाढ आंदोलन तापले; भीमानगर येथे रास्ता रोको, ‘पांडुरंग’च्या गव्हाणीत आंदोलकांच्या उड्या

सोलापूर : ऊस दरावरुन जिल्ह्यात आंदोलन तापले आहे. शेतकरी संघटनांनी हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३५०० रुपये दर जाहीर करून पहिली उचल ३२०० रुपये देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भीमानगर येथे शुक्रवारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले, तर श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्यावर संतप्त आंदोलकांनी गव्हाणीत उडी घेऊन आपला संताप व्यक्त केला. तिकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी वाखरी येथील ऊस दरवाढ आंदोलनाचा प्रश्न दिल्लीत मांडून सरकारने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी लावून धरली.

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडल्यानंतर महामार्गावर वाहनांची रांग लागली होती. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष आजिनाथ परबत, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, माढा तालुका अध्यक्ष प्रताप मिसाळ, संतोष चौधरी, तानाजी गोपणे, अंबादास जाधव, शिवाजी माने, प्रताप गायकवाड, चंद्रकांत कुटे, प्रताप पिसाळ, सुग्रीव भोसले, शहाजी गोफणे, हरिभाऊ माने यांच्यासह शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

सकाळी ११ वाजता शेतकरी कारखान्यावर पोहोचले मुख्य फटकातून आत जाऊन कारखान्याचा काटा व गव्हाणीत उड्या टाकल्याने कारखाना बंद करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देत गव्हाणीत बसूनच भजन सुरू केले. कारखाना प्रशासन व शेतकऱ्यांच्या बैठकी घेतल्या, मात्र शेतकरी ऊस दारावर ठाम असल्याने उशिरापर्यंत तिढा कायम होता.

‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले की, साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता ३५०० रुपये दर जाहीर करून पहिली उचल ३२०० रुपये द्यावी अन्यथा गव्हाणीत उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी कारखाना व चेअरमन बदलला की दर बदलतो. एकाच फडातून जाणाऱ्या उसास वेगवेगळा दर कसा? कारखानदार रिकवरी चोरून शेतकऱ्याची लूट करत आहेत. शेतकरी बांधवांनी राजकारण बाजूला ठेवून कोणाच्याही दबावाला बळी न पडता एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन केले.

वाहनांच्या लांबच लांब रांगा….

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भीमानगर येथे ऊस दरवाढीबाबत सोलापूर-पुणे महामार्गावर सकाळी ११-११:३० दरम्यान रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूस लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी स्पेशल फोर्स ही मागवण्यात आला होता. मागण्याचे निवेदन मंडल अधिकारी भगवान मुंडे यांनी स्वीकारले.

‘पांडुरंग’च्या गव्हाणीत ‘स्वाभिमानी’चे भजन…

ऊस गाळपाला कालावधी उलटला काही कारखान्यांनी पहिला हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केला यावर शेतक-यांचे समाधान न झाल्याने अखेर स्वाभिमानी ३५०० रुपये पहिल्या उचलीसाठी आग्रही असल्याचे दिसत असून, श्रीपूर येथील सुधाकरपंत परिचारक सहकारी जुना पांडुरंग साखर कारखान्यावर संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

उसाच्या केनवर चढून गव्हाणीत उड्या घेत भजन करून उसाला ३५०० साठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या शनिवारी सहकार महर्षीवरही आंदोलनाचा इशारा दिला आहे. श्रीपूर येथील साखर कारखान्यांनी २८५५ रुपयाचा पहिला हप्ता अदा केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवत कारखाना काही काळ बंद पडला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक भोसले, तानाजी बागल, सचिन पाटील, निवास नागणे, बाहुबली सावळे, बाळकृष्ण मगर, अमरसिंह माने देशमुख यासह ऊस दर संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

ऊस दर आंदोलनाचा आवाज दिल्लीत…

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील शून्य प्रहरामध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न ठामपणे मांडत केंद्र सरकारकडे तातडी हस्तक्षेपाची मागणी केली. पंढरपूर-वाखरी येथे गेल्या पाच दिवसांपासून ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची माहिती त्यांनी सभागृहात दिली. सोलापूर जिल्ह्याबाहेरील साखर कारखाने रु. ३२०० ते रु. ३५०० प्रतिटन दर जाहीर करत असताना, सोलापूर जिल्ह्यातील कारखाने केवळ रु.२८०० प्रतिटन दर देत आहेत. प्रचंड महागाई, खत व औषधांचे वाढते दर आणि एका खताच्या पोत्याची रु. २००० पर्यंत वाढलेली किंमत यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक चक्रव्यूहात अडकले असून कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here