सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे पिंपळनेर युनिट आणि करकंब कारखान्याने उसाचे अनुदानासह प्रती टन २,७५० रुपयांप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. १५ जानेवारीअखेर ऊस तोडणी, वाहतूक बिले वाहन मालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. कारखान्याने दहा दिवसांत ऊस बिले देण्याची परंपरा कायम राखली आहे. जानेवारीअखेरची बिले देणारा हा एकमेव कारखाना असल्याची माहिती संस्थापक-अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
आ. शिंदे म्हणाले की, कारखान्याने १० दिवसाला ऊस बिले देण्याची परंपरा कायम राखली असून ३१ जानेवारी अखेर ऊस बिल व १५ जानेवारीअखेर ऊसतोडणी वाहतूक बिल अदा करणारा एकमेव कारखाना आहे. पिंपळनेर युनिटने आजअखेर ११,८३,०८७ मे. टन व करकंब युनिटने ४,१०,०१६ मे. टन ऊस गाळप केले आहे. एकूण १५,९३,१०३ मे. टन गाळप झाले असून १६ ते ३१ जानेवारी या कालावधीत गाळपास आलेल्या उसाला प्रती टन ५० रुपये अनुदानासह २७५० रुपयांप्रमाणे ऊस बिल दिले जात आहे. कारखान्याने ६८ कोटी २१ लाख बँकेत जमा केले आहेत. १ ते २८ फेब्रुवारीदरम्यानच्या उसाला २८०० व मार्चपासून २८५० रुपये दर दिला जाईल.


















