पुणे / बीड : इतर देशांच्या तुलनेत भारतातही शेतीबरोबरच ऊस पिकात आमूलाग्र बदल घडत असून, भविष्यात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी हार्वेस्टर तसेच आधुनिक उपकरणांचा आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे, असे मत ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी व्यक्त केले. गेवराई (जि. बीड) येथील कृषी महोत्सवात ते बोलत होते. बोत्रे पाटील यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती घेतली. दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोत्रे-पाटील म्हणाले की, ओंकार ग्रुप सातत्याने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा ऊस दिल्यास अधिक चांगला बाजारभाव देण्याचा ओंकार ग्रुप नेहमीच प्रयत्न करीत आहे. प्रत्येक कृषी प्रदर्शन हे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असते. दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत असून, याचा शेतकऱ्यांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. त्यातून आपल्या शेतीला कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. महेश बेदरे यांनी मराठवाड्यात दिवसेंदिवस शेतीचे चित्र बदलत असून, हा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. बाबूराव बोत्रे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील शेतकऱ्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटला आहे असे सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, भाजपा नेते बाळ दादा पवार, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, योद्धाजित पंडित, अमोल कारंडे, राजेंद्र अतकरे, राजेंद्र मोटे, अजय दाभाडे, बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते. शिनुभाऊ बेदरे यांनी आभार मानले.

















