नवी दिल्ली : साखर उत्पादक त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉलच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये दोन नवीन डिस्टिलरीज उभारण्यासाठी ४६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
याबाबत कंपनीच्यावतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील राणी नांगल आणि साबितगढ येथे एकूण ४५० किलोलिटर प्रतिदिन क्षमतेसह दोन नवीन फीडस्टॉक (ऊस डेरिव्हेटिव्ह आणि ग्रेन) डिस्टिलरीज स्थापन करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. या विस्तारामुळे डिस्टिलरी क्षमता प्रतिदिन १,११० किलोलिटरपर्यंत वाढेल. दोन प्लांट उभारण्यासाठी ४६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. डिस्टिलरीज आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत व्यावसायिक उत्पादन सुरू करतील अशी अपेक्षा आहे.
त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ध्रुव साहनी म्हणाले, “आम्ही डिस्टिलरी विभागाच्या कामाने आनंदित आहोत. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कार्यरत असलेल्या ३२० KL प्रतिदिन क्षमतेच्या तुलनेत, आमच्याकडे सध्या ६६० KL प्रतिदिन क्षमता आहे. यातून डिस्टिलरी विभागाच्या उलाढालीत आणि नफ्यात लक्षणीय वाढ होईल. ” चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २८ टक्क्यांनी घसरून ६६.४५ कोटी रुपयांवर आला आहे. मागील वर्षी हा नफा ९२३०0 कोटी रुपये होता.















