‘व्हीएसआय’मध्ये ‘बदलत्या हवामानानुसार उस उत्पादन वाढीचे अद्ययावत तंत्रज्ञान” विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट (व्ही.एस.आय.) येथे “बदलत्या हवामानानुसार उस उत्पादन वाढीचे अद्ययावत तंत्रज्ञान” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन बुधवार, दि ३० जुलै रोजी धारवाड कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.एल.पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर आझाद कृषि विद्यापीठाचे (कानपूर) माजी कुलगुरू आणि भारतीय उस संशोधन संस्था, लखनौचे माजी. संचालक डॉ.एस.सोलोमन तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्ही.एस.आयचे नियामक मंडळ सदस्य डॉ.इंद्रजीत मोहिते तसेच संस्थेचे सल्लागार.शिवाजीराव देशमुख हे उपस्थित होते.

यावेळी स्वागत संस्थेचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी केले. कडू-पाटील यांनी यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या विविध संशोधनपर कार्यक्रमाची माहिती विशद केली. यामध्ये उस प्रजनन केंद्र (अंबोली) येथे सुरू असलेल्या उसाच्या जातींच्या निर्मितीचा उल्लेख, उसाचे उत्तम प्रतिचे बेणे पुरवठा आदी विषयांची माहिती दिली. चर्चासत्राच्या पुस्तिकेचे विमोचन संस्थेचे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी भारतातील विविध संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ, कारखाना प्रतिनिधी तसेच महाराष्ट्रातील विविध कारखान्यांचे कृषि अधिकारी व उस विकास अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

डॉ. पी. एल. पाटील यांनी उद्घानपर भाषणामध्ये उस हे पीक राष्ट्राच्या विकासाचा महत्वाचा कणा असल्याचे नमुद केले. साखर उद्योगावर हजारो शेतकरी, कर्मचारी अवलंबून असल्याचे ते म्हणाले. पाण्याचा अतिरिक्त वापर, असंतुलीत व अवेळी देण्यात येणारी खत मात्रा, सेंद्रिय व जैविक खते वापराचा अभाव आदी कारणांमुळे दिवसेंदिवस जमिनीची सुपिकता खालावत असून उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा कमी होत असल्याचे डॉ. पाटील यांनी नमुद केले. उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा वाढविण्यासाठी संशोधन संस्था, साखर उद्योग व शेतकरी यांनी एकत्रीतपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा वाढविण्यासाठी सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा एकात्मिक पध्दतीने वापर, योग्य प्रमाणात पाणी देणे, पाण्याचा ताण व जमिनीतील भारता सहन करणा-या उस जातींची लागवड, हिरवळीचे खतांचा वापर, पीक फेरपालट इत्यादी उपायांचा अवलंब केल्यास उत्पादकता वाढविण्यासाठी निश्चीतपणे मदत होईल, असे डॉ. पी. एल. पाटील यांनी यावेळी सांगितले.

डॉ.एस.सोलोमन यांनी आपल्या भाषणात पावसाच्या अनियमीतपणामुळे उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा कमी होत असल्याचे नमुद केले. भविष्यात वातावरणातील बदल तसेच अवर्षण परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन कमी होत जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर उपाय म्हणून बदलत्या हवामानात दुष्काळ परिस्थीतीमध्ये तग धरणा-या, उसाच्या नवीन जाती, रोग व किड प्रतिबंधक उसाच्या जाती तयार करणे, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य प्रमाणात पाणी व खत व्यवस्थापन करून जमिनीची सुपीकता टिकूण ठेवणे, सेंद्रिय व जैविक खताचा तसेच रासायनिक खतांचे व्यवस्थापन आदी गोष्टींचा अवलंब केल्यास उत्पादकता वाढविण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणामध्ये इंद्रजीत मोहिते यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या संशोधनपर कार्यक्रमांची माहिती दिली. संशोधनपर तंत्रज्ञानांचा एकत्रितपणे वापर केल्यास उसाचे सरासरी उत्पादन वाढविणे शक्य असल्याचे ते म्हणाले. या दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये विविध विषयांचे संशोधनपर लेख सादर होणार आहेत. संस्थेमध्ये विविध उत्पादने, उस तोडणी यंत्र प्रसारीत करण्यात आले आहेत. भारतातील विविध संशोधकांचे संशोधनपर लेख सादर करण्यात आले आहेत. संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.अशोक कडलग यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here