इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्या निमंत्रणावरून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल दिनांक 20 ते 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान इस्रायलला अधिकृतपणे भेट देणार आहेत. ही भेट भारत आणि इस्रायलमधील वाढत्या धोरणात्मक आणि आर्थिक संबंधांना अधोरेखित करत; व्यापार, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि गुंतवणूक या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या दोन्ही देशांच्या सामायिक वचनबद्धतेला प्रतिबिंबित करणारी आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की), असोचेम आणि स्टार्ट-अप इंडिया यांतील मिळून 60 सदस्यांचे व्यावसायिक शिष्टमंडळ गोयल यांच्यासोबत आहे.
या भेटीदरम्यान,गोयल इस्रायली वरिष्ठ नेत्यांसोबत उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका घेतील.गोयल यांचे इस्रायली समकक्ष, अर्थ आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्या व्यतिरिक्त, यावेळी गोयल काही इतर मंत्र्यांनाही भेटण्याची शक्यता आहे. व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, कृषी, पाणी, संरक्षण, उदयोन्मुख तंत्रज्ञान, जीवशास्त्र, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे आणि स्टार्ट-अपसह दोन्ही देशांच्या व्यवसायांमध्ये वाढीव सहकार्याच्या संधी ओळखणे यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित भारत-इस्रायल मुक्त व्यापार कराराच्या (FTA) प्रगतीचा देखील आढावा यावेळी घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मंत्रीमहोदय भारत-इस्रायल व्यावसायिक मंचाच्या बैठकीत सहभागी होतील, ज्यामध्ये दोन्ही बाजूंच्या आघाडीच्या व्यावसायिक संघटना आणि उद्योग प्रतिनिधींचा समावेश असेल. या मंचात उद्घाटन आणि समारोपाची संपूर्ण सत्रे, तांत्रिक चर्चा आणि व्यावसायिक भागीदारी वाढवणे, गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे आणि प्राधान्य क्षेत्रांमध्ये संयुक्त उपक्रमांसाठी मार्ग ओळखणे या उद्देशाने संरचित बिझिनेस टू बिझनेस (B2B) चर्चासत्रांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, उच्च-स्तरीय प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संघांची चौथी बैठक देखील दोन्ही बाजूंच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित केली जाईल.
कृषीक्षेत्र, जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करणे, सांडपाणी प्रक्रिया, सायबर सुरक्षा, जलद वाहतूक व्यवस्था (स्मार्ट मोबिलिटी), पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रातील प्रमुख इस्रायली कंपन्यांच्या वरिष्ठ नेत्यांची देखील गोयल भेट घेतील तसेच प्रमुख इस्रायली गुंतवणूकदारांशी संवाद साधतील.
तेल अवीवमधील अधिकृत कार्यक्रमांसोबतच, या दौऱ्यात इस्रायलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यवस्थेबद्दल माहिती देणाऱ्या प्रमुख संस्था आणि नवोन्मेष केंद्रांच्या भेटींचाही समावेश आहे. तसेच भारतीय समुदाय, भारतीय वंशाच्या व्यावसायिक नेत्यांसोबत परस्पर संवादसत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम देखील या भेटीदरम्यान होणार आहेत.
या भेटीमुळे भारत आणि इस्रायलमधील दीर्घकालीन भागीदारी आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील आणि परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्याचे नवे मार्ग निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
(Source: PIB)















