पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ‘वसंतउर्जा’ हे फवारणीसाठीचे जैविक औषध बनवले आहे. त्याचे अनेक फायदे ऊस शेतीसाठी होताना दिसत आहेत. वसंत उर्जाच्या वापरामुळे उसाचे जवळपास ३० ते ३५ टक्क्यापर्यंत उत्पादन वाढते, अशी माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे डॉ. सुनील दळवी यांनी दिली. राज्यातील ऊस पिकाबाबत व्हीएसआयतर्फे विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक खतांचा उसाला चांगला फायदा होण्यासाठी वसंत ऊर्जा ही निविष्ठा तयार करण्यात आली असून याचे चांगले फायदे शेतकऱ्यांना होताना दिसत आहेत. वसंतउर्जा हे एक जैवसंजीवक असून ते नॅनोकणांच्या स्वरूपात पिकाला दिले जाते. ही निविष्ठा बहुउपयोगी असून पिकावर येणाऱ्या जैविक आणि अजैविक ताणासाठी ही निविष्ठा उपयोगी येते. जिवाणू खताबरोबर, द्रवरूप खताबरोबर, पेस्टीसाईड खताबरोबर, तणनाशकासोबत या निविष्ठेचा वापर करता येतो. ज्या निविष्ठेबरोबर वसंतउर्जेचा वापर केला जातो त्या निविष्ठेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो, अशी माहिती डॉ. दळवी यांनी दिली.















