उत्तर प्रदेश : हापूर सहकारी ऊस समितीच्या लेखापालावर ५ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

हापूर : हापूर सहकारी ऊस समितीच्या लेखापालावर सुमारे ५ कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप आहे. येथील अकाउंटंटने १३० व्हाउचर सादर करून आठ खात्यांमध्ये सुमारे ५ कोटी रुपये वळवल्याचा आरोप आहे. यामध्ये सहकारी ऊस समितीचे सचिव आणि बँक कर्मचाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद मानली जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत हापूर सहकारी ऊस समितीचे अध्यक्ष कुणाल चौधरी म्हणाले की, समितीचे लेखापाल भरत कश्यप बँकेतील व्यवहाराचे काम पाहत असत. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी ते त्याच बँकेत व्हाउचर पाठवत असत. २५ एप्रिलपासून ते समितीकडे न फिरकल्याने आम्हाला संशय आला. कारखान्यातून पैसे आल्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. बँकेत चौकशी केल्यावर मला सांगण्यात आले की खात्यात कमी रक्कम शिल्लक आहे. याची चौकशी झाली आहे.

अध्यक्षांनी सांगितले की जेव्हा बँकेत जाऊन तपासणी केली तेव्हा अकाउंटंट भरत कश्यप यांनी बनावट व्हाउचर वापरून त्यांच्या खात्यांमध्ये बरेच व्यवहार केल्याचे आढळले. हा सुमारे ५ कोटी रुपयांचा घोटाळा आहे. हे समितीचे पैसे आहेत. या प्रकरणात, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधिताविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिले आहे. लिपिक बेपत्ता असल्याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिषेक पांडे म्हणाले की, सहकारी ऊस समितीमध्ये लेखापालाच्या पातळीवर आर्थिक अनियमितता उघडकीस आली आहे. ३ ते ४ कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे. समितीचे सचिव आणि इतर कर्मचारी, बँक कर्मचाऱ्याची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. चौकशीनंतर जो कोणी यात सहभागी असल्याचे आढळून येईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here