लखनौ : उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम आता वेगावला आहे. मात्र, यासोबतच ऊस गाळपाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीही वाढू ळागल्या आहेत. खास करुन साखर कारखान्याकडून होणाऱ्या ऊसाच्या कमी वजनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी याविषयी आवाज उठवला आहे. मुजफ्फरनगर जिल्ह्यातील नन्हेडा गावातील एका खरेदी केंद्रावर ऊसाचे कमी वजन केल्याचा आरोपाखाली सात अधिकारी आणि साखर कारखान्याच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. त्रिवेदी यांनी सांगितले की, बुधवारी अचानक पाहणी केल्यानंतर आढळले की, खाईखेडी साखर कारखान्याचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या ऊसाचे वजन कमी दाखवत होते. वजन करणाऱ्या मशीनसोबत छेडछाड करण्यात आली होती. या प्रकरणी साखर कारखान्याचे मालक राजकुमार याच्यासह आठ जणांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित अधिनियमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















