लखनौ : राज्यात लागवडीयोग्य शेतजमिनीची व्याप्ती वाढवणे आता शक्य नाही. एक ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रतियुनिट क्षेत्रातील पीक उत्पादनात वाढ करणे हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे उसासोबत मोहरी, मसूर, उडीद आणि मूग यांसारख्या उच्च मूल्य पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन, कमी खर्च आणि वर्षभर स्थिर उत्पन्नाची खात्री मिळेल. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट केले. राज्यात उसामध्ये तेलबिया आणि कडधान्यांचे आंतरपीक घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. तेलबिया आणि कडधान्यांचे आंतरपीक घेणे हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा उपक्रम २०२६-२७ ते २०३०-३१ दरम्यानच्या कालावधीत ‘मिशन मोड’मध्ये राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या उत्तर प्रदेशात २९.५० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक घेतले जाते. त्यात १४.६४ लाख हेक्टरवर नवीन लागवड क्षेत्र आणि १४.८६ लाख हेक्टरवरील खोडवा पीक क्षेत्राचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या ऊस पीक क्षेत्रात तेलबिया आणि कडधान्यांचे आंतरपीक घेतल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल आणि राज्य, राष्ट्रीय स्तरावर तेलबिया, कडधान्यांबाबत आत्मनिर्भरत होण्यास नवे बळ मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उसावर आधारित आंतरपीक पद्धत हे उत्तर प्रदेशातील शेतीच्या भविष्यासाठी एक नवीन मॉडेल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी भरघोस उत्पादन, अधिक उत्पन्न आणि जोखमीपासून संरक्षण मिळेल, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
















