महराजगंज : आगामी गळीत हंगाम २०२३-२४ साठी जिल्ह्यातील ऊसाच्या लागवड क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी नवे ऊस सर्वेक्षण धोरण लागू करण्यात आले आहे. हा सर्व्हे १५ एप्रिलपासून सुरू होवून दोन महिने म्हणजे १५ जूनपर्यंत सुरू राहिल. या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची नोंद आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन करायची आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रत्येक गळीत हंगामात संभाव्य उत्पादन लक्षात घेवून साखर कारखान्यांकडून कार्यक्षेत्रातील उसाचा सर्व्हे केला जातो. गळीत हंगाम समाप्तीच्या मार्गावर आहे. १५ एप्रिलपर्यंत गाळप पूर्ण होवून कारखाने बंद होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे ऊस विभागाने आगामी गळीत हंगाम २०२३-२४ साठीच्या सर्व्हेची तयारी सुरू केली आहे. यासाठी ऊस समितीचे कर्मचारी आणि साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची पथके तयार केली जातील. ही पथके शेतावर जाऊन सर्व्हे करतील. सर्व्हेमध्ये ऊसाची नोंद घेवून त्याची माहिती शेतकऱ्यांना एसएमएसवर दिली जाईल. शिवाय, यावेळी सर्व्हेसाठी जीपीएस यंत्रणा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याद्वारे ऊस लागवड क्षेत्राचा अचूक सर्व्हे केला जाईल असे प्रयत्न आहेत.















