बहराइच : कर्टानियाघाट वन्यजीव क्षेत्रात जंगलाचे चित्र बदलू लागले आहे. बिबट्यांनी जंगलाला नव्हे तर शेजारील दाट उसाच्या शेतांना आपले नवीन घर बनविले आहे. शेतात राहणारे बिबटे आता ‘केन लेपर्ड’ म्हणून ओळखले जात आहेत. दुसरीकडे, वाघांनाही त्यांचे पारंपारिक प्रदेश इतरांसोबत वाटून घ्यावे लागत आहेत. निसर्गात होणारे छोटे बदल आता मोठ्या बदलांचे रूप धारण करत आहेत. वन्यजीवांच्या वर्तनातील या बदलांचे एक उदाहरण कर्टानियाघाट वन्यजीव विभागात दिसून येते. पूर्वी, सुमारे १० किमी परिसरात एक वाघांची जोडी एकटी राहत होती. वन विभागाने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कर्टानियाघाट अभयारण्यात फक्त १८ किमीच्या त्रिज्येत आठ वाघ राहत आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बिबट्यांचेदेखील स्थान, जीवनशैली आणि वर्तन बदलले आहे. काही बिबटे आता जंगल सोडून उसाच्या शेतात राहू लागले आहेत. कटार्निया परिसरात त्यांची संख्या सुमारे शंभर असल्याचे सांगितले जाते. हे बिबटे शेतात राहतात आणि ऊस तोडणी झाल्यानंतर ते जवळच्या झुडुपांमध्ये जातात. शेतात राहणाऱ्या अशा बिबट्यांची संख्या सुमारे १०० असल्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणादरम्यान असे आढळून आले की हे उसात राहाणारे बिबटे जंगलाकडे जात नाहीत; उसाची शेती आता त्यांना जंगलासारखी वाटते असे डीएफओ बी. शिवशंकर यांनी सांगितले. दुसरीकडे, काही बिबटे अजूनही जंगलात राहतात, ज्यांची संख्या सुमारे १२५ ते १५० आहे. गावांमध्ये होणारे बहुतेक प्राण्यांचे हल्ले हे शेतात राहणाऱ्या या केन बिबट्यांकडून होतात. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनाही अनेकदा घडतात. जंगले आकुंचित होत असल्याने ही स्थिती बनल्याचे वनतज्ज्ञ आणि वन्यजीव तज्ज्ञांचे म्हणणे आहे.