सहारनपूर : उसाची थकीत बिले न दिल्याबद्दल सहारनपूरचे जिल्हाधिकारी मनीष बन्सल यांनी साखर कारखान्याच्या प्रतिनिधींना फटकारले. आता जर शेतकऱ्यांना ऊस बिले मिळण्यास आणखी विलंब झाला तर साखर कारखान्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, ऊस बिले देण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकरी थकबाकीच्या रकमेवर व्याजाची मागणी करत आहेत. तर मूळ एफआरपीदेखील देणे शक्य नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना जिल्हाधिकारी मनीष बन्सल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिले लवकरात लवकर अदा करावीत. जर असे झाले नाही तर साखर कारखानदारांवर कडक कारवाई केली जाईल. यावेळी गंगनौली काखान्याकडे शेतकऱ्यांचे १६८.५९ कोटी रुपये थकीत असल्याचे आणि दया साखर कारखान्यावर २७.३४ कोटी रुपये थकबाकी असल्याचे आढळून आले. तोडरपूर शाकंभरी कारखान्याकडे ३७.८४ कोटी रुपये आणि बिडवी साखर कारखान्याकडे २३.४० कोटी रुपये थकित आहेत. गंगनौली साखर कारखान्यात सर्वात वाईट परिस्थिती दिसून आली. दरम्यान, बिले मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी संतप्त आहेत. आता शेतकरी संघटनांनीच म्हटले आहे की जर प्रशासन वेळेवर पैसे देऊ शकले नाही तर ते रस्त्यावर उतरावे लागेल.