लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ऊस विकास आणि साखर उद्योग विभागाने खास टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. तसेच ऊस पिकातील पाणी ओसरू लागल्यानंतर काही ठिकाणी किड रोगांचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची संवाद साधून उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही राज्य सरकारने केली आहे.
खरे तर पावसाळ्यात ऊस पिक अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होते. मात्र या काळात किडींचा फैलाव होण्याची शक्यता असते. सध्या उत्तर प्रदेशच्या अनेक भागाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे त्यामुळे ऊस विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मीना कुमारी यांनी अधिकाऱ्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांची चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या भागात अद्याप पुराचे पाणी आहे, तेथील लोकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. तर ज्या जिल्ह्यांतून पुराचे पाणी ओसरले आहे. त्यांना कीड व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.