बरेली : जिल्ह्यात ऊस पिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. यावेळी सर्वेक्षणावेळी ऊस लागवड क्षेत्रात बरीच घट झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस नसल्याने वेळेपूर्वी गाळप हंगाम संपवावा लागेल असे स्पष्ट झाले आहे. पीक सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, आता डीसीओपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसमोर सर्वेक्षणाचा डेटा दाखवत आहेत. १ मे ते ३० जून या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणानंतर असे आढळून आले की जिल्ह्यात १,०१,३२१ हेक्टरमध्ये उसाचे पीक आहे. गेल्या वर्षी १,०७,७७० हेक्टरमध्ये उसाचे पीक होते, त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस कमी मिळाला. कारखान्यांचे गाळप वेळेपूर्वीच थांबले होते. यावेळी तर ऊस लागवड आणखी ६,४४९ हेक्टरने घटली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस पिकाच्या सर्वेक्षणात असे आढळून की नव्याने लागवड कमी झली आहे. गेल्या वर्षी ९२,८७८ हेक्टरमध्ये ऊस लागवड झाली. यावेळी ८६,६४० हेक्टर एवढेच ऊस क्षेत्र आहे. मात्र, जिल्हा ऊस अधिकारी दिलीप कुमार सैनी यांनी यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढल्याचा दावा केला. यावेळी ३१०० नवीन ऊस उत्पादक शेतकरी आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, पथक गावोगावी जाऊन सर्वेक्षण आणि नोंदणी प्रदर्शन करीत आहे. पथके शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर, बँक खाते देखील अपडेट करत आहेत. यासाठी एकूण १६८ पथके तैनात करण्यात आली आहेत. या वर्षीच्या पीक सर्वेक्षणाबाबत शेतकऱ्यांच्या आक्षेपांचे निवारण झाल्यानंतर, ऊस विभाग १० सप्टेंबरपर्यंत कॅलेंडर ऑनलाइन करेल.