इथेनॉल पुरवठ्यात उत्तर प्रदेशने मारली बाजी, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

पुणे : देशभरात इथेनॉल निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र आघाडीवर असूनही, प्रत्यक्षात पुरवठ्याच्या बाबतीत मात्र तो उत्तर प्रदेशच्या मागे पडला आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४- २५च्या सुरुवातीच्या सहामाहीतील उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जूनअखेर देशभरातून एकूण ४९९ प्रकल्पांनी तेल कंपन्यांना ५८७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. यात उत्तर प्रदेशने सर्वाधिक ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. तर महाराष्ट्राने ६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ६० कोटी लिटरचा पुरवठा करत तमिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात गळीत हंगामात १६ टक्के ऊस घटल्याचा परिणाम इथेनॉल आणि साखर या दोन्हीच्या उत्पादनावर झाला आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण विभागाकडील माहितीनुसार, सध्या देशाची वार्षिक इथेनॉल निर्मिती क्षमता १८२२ कोटी लिटर इतकी आहे. या क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. महाराष्ट्राची इथेनॉल उत्पादन क्षमता ३९६ कोटी लिटर आहे. क्षमता सर्वाधिक असूनही, तुलनेत इथेनॉल निर्मिती कमी झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश ३३१ कोटी लिटर क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर, तर कर्नाटक २७० कोटी लिटर क्षमतेसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकने ४७ कोटी लिटरचा पुरवठा केला आहे. हवामान बदलाचा इथेनॉल पुरवठा साखळीवर थेट परिणाम झाला. क्षमतेने ऊस गळीत हंगाम चालल्याचा फटका महाराष्ट्र व कर्नाटकातील उसावर आधारित इथेनॉल प्रकल्पांना बसला आहे असे साखर तज्ज्ञ विजय औताडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here