हरिद्वार : लांधौरा शहरात आणि आसपास दोन डझनहून अधिक गुऱ्हाळघरे आहेत. ही गुऱ्हाळघरे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याचा इंधन म्हणून वापर करत आहेत. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. आणि प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे प्लास्टिक कचरा आणि जुने रबर टायर इंधन म्हणून जाळणाऱ्या गुऱ्हाळघरांवर संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. यामध्ये पाच गुऱ्हाळघरे सील करण्यात आली. पाच ठिकाणी गुळाचे नमुने घेण्यात आले.
या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी आणि सहदंडाधिकाऱ्यांकडे नगर पंचायत अध्यक्ष आणि नगरसेवक प्रतिनिधी रब्बन यांनी तक्रार केली. सोमवारी तहसीलदार विकास अवस्थी, प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेंद्र सिंह कठायत, सहाय्यक साखर आयुक्त सुप्रिया मोहन, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी योगेंद्र कुमार पांडे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय पथक घटनास्थळी पोहोचले. पथकाने लांधौरा शहरातील चार गुऱ्हाळघरे सील केले. लिब्बरहेड्डी येथे आणखी एक गुऱ्हाळघर सील करण्यात आले. दोन भूखंडांवर प्लास्टिक कचरा, रबर टायर आणि कपडे आढळले. भूखंड मालकांवर कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा विभागाने गुळाचे चार नमुनेदेखील गोळा केले. तहसीलदार विकास अवस्थी यांनी सांगितले की, संयुक्त पथक या संदर्भात कारवाई करत राहील.