नवी दिल्ली : सहकार मंत्रालयाचे सचिव (एमओसी) डॉ. आशिष कुमार भुतानी यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF)चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आणि डीएफपीडीचे सहसचिव तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत NFCSFच्या अध्यक्षांनी साखर कारखान्यांबाबत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NFCSF चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन सहकार मंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्राबाबत ही एक पाठपुरावा बैठक होती. यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचे डायव्हर्शन आणि मासिक साठा मर्यादा या दोन महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. याबाबत मंत्री अमित शहा यांनी बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात एमओसी सचिवांनी एनएफसीएसएफचे एमडी आणि जेएस (डीएफपीडी) तसेच इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी दोन्ही मुद्यांवर सखोल चर्चा होऊन ते सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये बी-हेवी मोलॅसेस (बीएचएम) पासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली होती, परंतु नंतर साखरेचे डायव्हर्शन १७ लाख टनांपर्यंत मर्यादित केले. अलीकडे, साखर कारखान्यांना त्यांच्या बीएचएमचा विद्यमान साठा इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्याची परवानगी दिली.


















