सांगली : विश्वासराव नाईक साखर कारखान्याची गाळप क्षमता दहा हजार टन प्रतिदिन, डिस्टिलरी प्रकल्प दोन लाख लिटर प्रतिदिन क्षमतेने वाढविण्यात येणार आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातील वीजदर कमी होणार आहे. त्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी दीड टनाचे सोलर एनर्जी, प्रेसमेड व डिस्टिलरी प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रत्येकी पाच टनाचे दोन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केली. चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक सभागृहात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, विराज नाईक, दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, सम्राट सिंह नाईक उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष नाईक म्हणाले की, कारखान्याची एक रुपयाही कोणाची थकबाकी नाही. केवळ इथेनॉल प्रकल्पाचे देणे आहे. कारखाना शेतकऱ्यांना अनुदानावर ऊस रोपे देत आहे. काही नर्सरीशी करार करुन ही रोपे सर्वांना देण्याचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत वाढविण्याची गरज आहे. संचालक विराज नाईक यांनी विश्वास समृद्ध शेतकरी योजना, एक रुपयात ऊस रोपे देण्याचे काम कारखान्यातर्फे केले जात असल्याचे सांगितले. यावेळी संचालक दिनकर पाटील, विजयराव नलवडे, सुरेश चव्हाण, विश्वास पाटील, रणजितसिंह नाईक, दत्तात्रय पाटील, प्रमोद नाईक, भूषण नाईक, विवेक नाईक, हंबीरराव पाटील, देवेंद्र नाईक, तानाजीराव साळुंखे, विजय पाटील यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते.