पुणे : ब्राझिल येथे उसाच्या नवनव्या जातींचे संशोधन करणाऱ्या सीटीसी या खाजगी संशोधन संस्थेशी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट (व्हीएसआय) ने तंत्रज्ञानाबाबतचा आंतरराष्ट्रीय करार करण्याचा निर्णय राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, व्हीएसआय, राज्य सहकारी साखर कारखाना संघाने आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
साखर संकुल येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२) याबाबत बैठक झाली. यावेळी ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ‘व्हीएसआय’चे विश्वस्त जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगांवकर, आमदार अभिजित पाटील, इंद्रजित मोहिते, अशोक पवार, साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली.
ब्राझिल दौऱ्याच्या निमित्ताने साखर उद्योगाच्या ज्या अडचणी आता समोर आलेल्या आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर उद्योगाचे शिष्टमंडळ लवकरच दिल्ली येथे भेट घेणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यांशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
ब्राझिलमध्ये साखर उद्योगाची सुमारे ३ लाख ६० हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल
हर्षवर्धन पाटील म्हणाले, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने सहा दिवसाचा ब्राझिल येथील साखर उद्योगाचा अभ्यास दौरा नुकताच झाला. त्याची माहिती बैठकीत विस्ताराने देण्यात आली. तेथे भारतीय शिष्टमंडळाने अनेक कारखाने व संस्थांना भेटी दिल्या. ब्राझिलमध्ये ३६५ साखर कारखाने आहेत. सुमारे ३ लाख ६० हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असून, त्यामध्ये ७० हजार शेतकरी ऊस पिकवितात. त्यापैकी ७० टक्के कारखान्याचे मालक असून, ३० टक्के कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणारे आहेत. तेथील सरकारचे कोणतेही नियंत्रण साखर उद्योगावर नाही. तेथे इंधनांमध्ये ३५ टक्के इथेनॉल मिश्रण करतात. ब्राझिलमध्ये यांत्रिकीकरणाद्वारे ऊस लागवड, ऊस तोडणीवर शंभर टक्के भर आहे. ब्राझिलमधील शास्त्रज्ञ ‘व्हीएसआय’मध्ये बोलवणार असल्याचे ते म्हणाले.