नवीन बाजारपेठा शोधू… शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेने लादलेल्या टेरिफच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले. शेतकरी समुदायाच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले. नवी दिल्लीतील सुब्रह्मण्यम हॉलमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चौहान यांनी भारताची लोकसंख्या ही भारताची ताकद आहे आणि देशाला नवीन बाजारपेठा देखील मिळतील, असे सांगितले.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादला आहे आणि भारताच्या कृषी आणि दुग्ध क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अमेरिकेने दबाव बनवला आहे, याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना चौहान म्हणाले की दोन्ही देशांमध्ये जमीन मालकी आणि शेती पद्धती आणि उत्पादन खर्चात मोठी तफावत आहे. त्यांच्याकडे १०,००० हेक्टर, १५,००० हेक्टर जमीन आहे, तर आमच्या शेतकऱ्यांकडे एक एकर ते तीन एकर जमीन आहे. अनेकांकडे तर फक्त अर्धा एकर जमीन आहे. अशास्थितीत ही स्पर्धा योग्य आहे का? असा सवाल कृषीमंत्री चौहान यांनी केला.

ते म्हणाले, अमेरिकेत प्रति हेक्टर उत्पादन खर्च कमी आहे. तिथे जीएम बियाणे वापरले जाते, त्यामुळे उत्पादन जास्त आहे आणि खर्च कमी आहे. भारतात प्रति हेक्टर उत्पादन खर्च तिथल्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कृषी मालाला भारताची बाजारपेठ खुली केल्यास भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान झाले असते. त्यामुळे काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे ते पुढे म्हणाले. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पावर प्रकाश टाकला आणि पंतप्रधानांनी नेहमीच मजबूत, धाडसी, राष्ट्रकेंद्रित निर्णय घेतले आहेत, ज्यासाठी देश कायम ऋणी राहील यावर भर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here