पुणे : पूर्वी ऊस पिकावर दुय्यम समजल्या जाणाऱ्या पांढरी माशी व लोकरी मावा या किडी हळूहळू प्रमुख किडी बनताना दिसत आहे. पाणी साचलेल्या शेतांमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो, तर वाणानुसारही प्रादुर्भावात चढ-उतार जाणवतो. शेतामध्ये पाणी साचून राहणे जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडणे, नत्रयुक्त खतांचा असमतोल व अवेळी वापर, किडीच्या प्रजननास पोषक वातावरण, प्रदीर्घ काळ हवेतील जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण व उष्ण हवामान, पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप किंवा खंड पडणे, लागवडीसाठी रुंद पानांच्या वाणांची निवड, खोडव्याचे अयोग्य नियोजन आदी कारणे यासाठी आहेत. या किडींपासून पिकाचे वेळीच संरक्षण करणे गरजेचे आहे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खोडवा उसात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत अधिक जाणवतो. यातून ऊस उत्पादनात साधारणतः ८६ टक्क्यांपर्यंत घट आढळते. साखरेच्या उताऱ्यात ३ ते ४ युनिटने घट होते. त्यामुळे या किडीपासून ऊस पिकाचे वेळीच संरक्षण करणे गरजेचे आहे, असा सल्ला राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभागातील डॉ. अरुणकुमार बागडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील पीएच डी. स्कॉलर रवींद्र पालकर, शुभम पाटील यांनी दिला आहे. पांढऱ्या माशीमुळे उसाच्या उत्पादनात साधारणतः ८६ टक्क्यांपर्यंत घट आढळते, तर साखरेच्या उताऱ्यात ३ ते ४ युनिटने घट होते. पांढरी माशी नियंत्रणासाठी उसाच्या शेतात पाणी साचल्यास त्वरित निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. पावसाचा ताण पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ राहिल्यास पूरक सिंचनाची व्यवस्था करावी. रासायनिक खते विशेषतः नत्रयुक्त खते शिफारशीनुसार आणि संतुलित प्रमाणात वापरणे आवश्यक आहे असा सल्ला या कृषीतज्ज्ञांनी दिला आहे.