कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन ३५०० रुपयांवर पहिली उचल जाहीर केली आहे; मात्र गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील कारखानदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. येत्या शनिवारपर्यंत ३५०० रुपयांवर पहिली उचल जाहीर केली नाही, तर रविवारपासून (ता. २३) त्या कारखान्यांवर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ‘स्वाभिमानी’तर्फे पहिली उचल ३६०० रुपये आणि ३१ कोटी रुपयांच्या थकित एफआरपीसाठी शुक्रवारपासून (ता. १४) पदयात्रा सुरू होती. त्याची सांगता नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे शनिवारी (ता. १५) झाली. याप्रसंगी शेट्टी बोलत होते. अजितसिंह शिंदे-नेसरीकर अध्यक्षस्थानी होते.
शेट्टी म्हणाले, पंचवीस वर्षे झाली आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांत जनजागृती केली जाते आहे. उसाला पहिली उचल ३६०० रुपये ही मागणी रास्तच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारी सदृढ झाली आहे. कारखाने ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. रिकव्हरी चोरी, काटामारीतून कारखानदार शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. ‘स्वाभिमानी’चे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, उसाला पहिली उचल ३६०० दिली नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेतकरी एकजुटीची ताकद कारखानदारांना दाखवून देऊ. कर्नाटक रयत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जियाऊल वंटमोरी, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बसवराज मुत्नाळे, आजरा तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, जगन्नाथ हुलजी, दयानंद शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी यशोधन शिंदे-नेसरीकर, आनंदराव कुलकर्णी, सुभाष पाटील, धनाजी पाटील, अशोक पाटील, सखाराम केसरकर, वसंत पाटील, गोपाळ मरबसवन्नावर, प्रभू वंटमोरी, प्रकाश मुरकुटे, अनिल कोकितकर, अजित तुरटे, विलास पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मनोहर दावणे यांनी सूत्रसंचालन केले.


















