पुणे : माळेगावच्या शिवारात ‘एआय’ची क्रांती होणार आहे. ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरु होत आहे. या तंत्रज्ञानाचा खर्च हेक्टरी २५ हजार असून शेतकऱ्यांना ‘व्हीएसआय’ संस्थेकडून ९ हजार २५० आणि माळेगाव कारखान्याकडून ६ हजार ७५० अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे ऊस शेतीला आधुनिकतेची जोड देत, माळेगाव सहकारी साखर कारखान्याने शाश्वत ऊस रोपवाटिकेचा प्रकल्प दोन एकर क्षेत्रात उभारला असून, त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि कारखान्याचे अध्यक्ष पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत शेतकऱ्यांना शिवारात हे तंत्रज्ञान राबवण्यासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पवार म्हणाले, एआय हे केवळ शहरांसाठी नाही, ते शेतकऱ्यांच्या हातातही पोहोचायला हवे. माळेगाव कारखाना, बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १० लाख टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे, विश्वासराव देवकाते, बाळासाहेब तावरे, नितीन सातव, योगेश जगताप, तानाजी कोकरे, गणपतराव खलाटे उपस्थित होते. यावेळी संचालक नितीन सातव यांनी नव्या रोपवाटिकेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश देवकाते यांनी आभार मानले.