अहिल्यानगर : गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडीत राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद स्वीकारताच अरुण तनपुरे व त्यांचे चिरंजीव कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे जवळचे नातेवाईक तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे बंधू व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते आहेत. अरुण तनपुरे घेतलेल्या या राजकीय निर्णयामुळे बंद पडलेल्या डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याला सरकार आर्थिक मदतीच्या माध्यमातून नवसंजीवनी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जापोटी जप्त केलेल्या राहुरीतील तनपुरे कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. त्यामध्ये प्रसाद तनपुरे व अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत कारखाना ताब्यात घेतला. बंद पडण्यापूर्वी हा कारखाना माजी खासदार डॉ सुजय विखे यांच्या वर्चस्वाखाली होता. कारखान्याच्या निवडणूक काळातच माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रत्यक्षात अध्यक्षपदी अरुण तनपुरे यांची निवड होताच काही दिवसात त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अरुण तनपुरे हे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीही आहेत.
या प्रवेशापूर्वी अरुण तनपुरे यांनी काही दिवसातच गोड बातमी मिळेल, असे सुतोवाच केले होते. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आता कारखाना सुरू होण्यासाठी राज्य सरकार मदत करणार का, याकडे राहुरीतील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. अचानक झालेल्या घडामोडीमुळे नगर जिल्ह्यात चर्चा होत आहे. या प्रवेशामागे बंद पडलेला कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते. राज्य सरकारकडून कारखान्याला लवकरच मदत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.