नवी दिल्ली : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात परत आला आहे. भारत १३ वर्षांनंतर विश्वविजेता बनला आहे. टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. याआधी भारतीय संघ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. सर्व खेळाडू गुरुवारी सकाळी नवी दिल्लीत पोहोचले आहेत. एअर इंडियाच्या खासगी चार्टर्ड विमानाने टीम इंडिया आज परतली असून आजच मुंबईला रवाना होणार आहे.
टीम इंडियाचे दुसरे टी २० विजेतेपद जिंकल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर आगमन झाले. कर्णधार रोहित शर्माने आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये केक कापून सेलिब्रेशन केले. क्रिकेटप्रेमींनी त्यांच्या टीम इंडियाचे विमानतळ आणि हॉटेलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ढोल वाजवताना पाहिल्यावर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. या दोघांसोबत इतर वादकही ढोलाच्या तालावर नाचताना दिसले. सूर्यकुमार यादव यांनी मनमोकळे नृत्य केले. दरम्यान, भारतीय संघ पंतप्रधानांसोबत नाश्ता करणार आहे. यानंतर संघ मुंबईला रवाना होईल. टीम इंडियाची विजयी परेड एनसीपीए नरिमन पॉइंट ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमपर्यंत काढण्यात येणार आहे.












