“एकरकमी एफआरपी सोबत अधिक 350 मिळालेच पाहिजेत”

कोल्हापुर: साखर कारखानदार दरवर्षी अडचणींचा पाडा वाचत शेतकर्‍याला लुबाडत आहेत. थकीत एफआरपीसह व्याजाची 15 टक्के रक्कम कधी देणार? तसेच चालू हंगामात एफआरपीसह अधिकचे 350 रुपये मिळालेच पाहिजेत. साखर कारखानदारांना शेतकर्‍यांची लुबाडणूक करू देणार नाही, असा इशारा जय शिवराय किसान मोर्चा, बळीराजा शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश या शेतकर्‍यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मागील एफआरपीचे किमान 98 कोटी रुपये थकविले आहेत. अनेक कारखान्यांनी वेळेत एफआरपी दिली नाही. त्यास जबाबदार कोण? असा सवाल करून या संघटनांनी यापुढे ऊस दराच्या वाटाघाटी करताना आम्हालाही चर्चेत सहभागी करुन घ्या. मंत्री गटाची स्थापना झाली नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यावी, अशी जोरदार मागणी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केली. आंदोलन अंकुशचे धनाजी चुड़मुंगे म्हणाले, गेल्या पाच सहा वर्षांत शेतकर्‍यांचे 122 कोटी रुपयांपेक्षा अधिक एफआरपीची देणी आहेत. मागील वर्षी एफआरपी अधिक 200 रुपये ठरले होते. किती कारखान्यांनी हे पैसे दिले, याचा जाब विचारण्याची गरज आहे. दिवाळी दरम्यान साखरेला भाव चांगला होता . त्याशिवाय उपपदार्थांचे उत्पादनातून कारखान्यांना फायदा होतोच. त्यामुळे एफआरपीसह जादाचे 350 रुपये उसाला दर मिळू शकतो.

जय शिवराय किसान मोर्चा, बळीराजा शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश या संघटनांतर्फे 27 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात शेतकरी एल्गार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषेदेला शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. यावेळी श्रीकांत माने-गावडे, अविनाश पाटील, सुधाकर उदगावे, सावन कांबळे, संभाजी पाटील, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

कर्नाटकातून जाग्यावर टनाला रोख पैसे देऊन ऊस खरेदी केला जातो. 2200 ते 2400 रुपयाला कमी रिकव्हरीचा खरेदी केलेला ऊस कारखान्यांना 2900 रुपयांपर्यंत घातला जातो. अशा प्रकारे गेटकेनद्वारे टनापाठीमागे पैसे मिळविणारी टोळीच कार्यरत आहे. यात काही कारखानदारांसह अनेक मोठे लोक सहभागी असल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here