बी हेवी मोलासीसपासून इथेनॉल निर्मितीची परवानगी देण्याची शरद पवारांची मागणी

पुणे : ‘ब’ दर्जाच्या मळीतील शर्करांश कमी करण्यासाठी ३.५ उत्कलांक बिंदूपर्यंत इथेनॉल उत्पादनास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना पत्र पाठविले आहे. यातून अतिरिक्त सामग्रीची गरज भासू न देता इथेनॉलनिर्मितीही होईल आणि बाजारपेठेत साखरेचे दरही नियंत्रित राहतील, असा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांमधील वाढीव गाळप कार्यक्षमता, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुन्हा झालेला पाऊस यामुळे साखर उत्पादनात वाढ होईल, असा दावा पवार यांनी केला आहे.

पवार यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. ‘ब’ श्रेणीतील मळीपासून इथेनॉल उत्पादन केल्यास प्रतिटन १९ लिटर, तर ‘क’ श्रेणीतील उत्पादन केल्यास प्रतिटन ११ लिटर सरासरी इथेनॉल निघते. मिळणारी साखर आणि इथेनॉल याचे प्रमाण लक्षात घेता इथेनॉल उत्पादनास परवानगी दिली, तर ९२५ कोटी रुपयांचे नुकसान टळू शकेल, असे केंद्राला सुचविण्यात आले होते. ‘ब’ श्रेणीतील मळीपासून इथेनॉल उत्पादनात सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या कारखान्यांची संख्या ७१ होती. त्यातील बहुसंख्य कारखान्यांनी ७९.७८ लाख लिटर रेक्टिफाइड स्पिरिट, ९३.६६ लाख लिटर इथेनॉल आणि २.५६ लाख टन मळी असल्याची आकडेवारी राज्य साखर संघाने पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नमूद केलेली होती. आता हा प्रश्न पवारांनी सहकारमंत्र्यांकडे मांडला आहे. ‘ब’ श्रेणीपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली, तर राज्यातील आसवनी प्रकल्पांचे बिघडलेले अर्थकारणही सुधारेल, असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here