देशात कोरोना व्हायरसचे १.४५ लाख नवे रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० लाखांवर

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची गती वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांतच १० लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येबरोबरच देशात संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचा दरही वाढला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात एकूण १ लाख ४५ हजार ३८४ नवे रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत ७७ हजार ५६७ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ७९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी ४,६,७ आणि आठ एप्रिल रोजी कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारी हादरवणारी आहे. कोरोनाचे बेफाम फैलाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशात कोरोना संक्रमणाचे एकूण रुग्ण १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ झाले आहेत. तर कोरोना महामारीपासून १ कोटी १९ लाख ९० हजारहून अधिक नागरिक बरे झाले आहेत. देशात एकूण १० लाख ४६ हजार ६३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १,६८,४३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाच्या लसीकरणाला जोर
देशभरात कोरोना लसीकरण अभियानालाही गती देण्यात आली आहे. ९ एप्रिलअखेर ९ कोटी ८० लाख ७५ हजार १६० डोस लोकांना देण्यात आले आहेत. गेल्या दिवसभरात ३४ लाख १५ हजार ५५ डोस दिले गेले. तर महाराष्ट्रात काही दिवसात ५५ हजारहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासात शुक्रवारी, दिल्लीमध्ये ८५२१ नवे कोरोना रुग्ण आढळले.
एक एप्रिलपासून देशात ४५ वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा मृत्यूदर १.२७ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के इतका आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here