राज्यात १२ कारखान्यांची धुराडी थांबली; हंगाम अंतिम टप्प्यात

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पुणे : चीनी मंडी

महाराष्ट्रातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील पाच साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण १९२ साखर कारखान्यांपैकी गाळप थांबलेल्या कारखान्यांची संख्या १२ झाली आहे.

या संदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘राज्यात आतापर्यंत ८४१ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. हंगाम ११० दिवसांत संपला आहे. अर्थात राज्यातील काही मोजके कारखाने एप्रिल अखेरपर्यंत चालणार आहे. अन्याथा इतर कारखाने मार्चमध्येच गाळप थांबवतील.’

राज्यात केजीएस शुगर्स या साखर कारखान्यातील गाळप पहिल्यांदा थांबवण्यात आले. कारखाना ६९ दिवस चालला आणि ३ फेब्रुवारीला गाळप थांबले. कारखान्यात ४९ हजार ४६८ टन ऊस गाळप झाले आणि त्यातून ८.६८ टक्क्यांनी ४२ हजार ९४० क्विंटल साखर तयार झाली. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी जय श्रीराम साखर कारखान्याचे गाळप थांबले. त्यांनी १ लाख ६६ हजार ४०२ टन गाळपातून १ लाख ७२ हजार ५०० क्विंटल साखर तयार केली. त्यांना १०.३७  टक्के उतारा मिळाला. पहिल्या टप्प्यातील या कारखान्यांनंतर आता पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप थांबवण्यात आले आहे.

एफआरपीची थकबाकीही आता कमी होत असल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली. गेल्या चार दिवसांत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ४०० कोटी रुपये भागवले आहेत. त्यामुळे एकूण थकबाकी ४ हजार २०० कोटी रुपयांच्या घरात आली आहे.

साखर आयुक्तालयाकडून साखरसाठा जप्त करण्याचा इशारा दिल्यानंतर हादरलेल्या साखर कारखान्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास शेतकऱ्यांची २ हजार कोटी रुपयांची बिले भागवली आहेत. आयुक्तालयाने ४५ साखर कारखान्यांना नोटिस दिल्यानंतर राज्यात कारखान्यांनी एकूण ५ हजार ९१५ कोटी रुपयांची बिले अदा केली. तर, राज्यातील १७ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांशी टप्प्या टप्प्याने एफआरपी देण्याचा करार केला आहे.

राज्यात जवळपास २० साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी जमा केली आहे. तर, ४४ कारखान्यांनी ८० ते ९०, ६१ कारखान्यांनी ६० ते ७९ तर ४२ साखर कारखान्यांनी ४० ते ५९ टक्के एफआरपी जमा केली आहे. राज्यातील १९ साखर कारखान्यांनी केवळ २० टक्के एफआरपी जमा केली आहे. ही आकडेवारी १५ फेब्रुवारीपर्यंतची असल्याचे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मार्च अखेर थकीत एफआरपी १० टक्क्यांपेक्षाही कमी असेल, अशी आशा साखर आयुक्त गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here